स्थैर्य, सातारा, दि. २७ : सातारा शहरात पहिला कोरोनाचा रुग्ण मे महिन्याच्या प्रारंभी सापडला त्यानंतर 15 जूनपर्यंत सातारा शहरातील रुग्ण संख्या मर्यादित होती. महाराष्ट्र शासनाने ‘मिशन बिगिन अगेन’ ची सुरुवात केल्यावर जिल्हय़ात व सातारा शहरात बाहेरुन येणार्यांची संख्या वाढली. बाहेरुन आलेल्या नागरिकांमुळे कोरोना वाढला असून तो गर्दीमुळे नसल्याचा दावा करत सातारा शहरातील व्यापार्यांनी मार्केट सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी केलीय.
व्यापार्यांनी याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, 26 रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर प्रशासनाने पुन्हा दि. 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन जारी ठेवत अत्यावश्यक सेवांना परवानगी दिलीय. मात्र या निर्णयामुळे सर्व व्यापारी, सर्वसामान्य नागरिक, रोज कष्ट करुन जगणारे कामगार यांच्यावर अन्याय होत असून ते भरडले जात आहेत.
कोरोना संकटकाळात सर्व जिल्हय़ाने प्रशासनाने दिलेले आदेश पाळलेले आहेत. व्यापारी, नागरिक, कामगार, मजूर यांनी प्रशासनाला सहकार्य केलेले आहे. जिल्हय़ात रुग्ण वाढले म्हणून दि. 17 ते 26 लॉकडाऊन केला. त्याला देखील सहकार्य केलेय मात्र सुधारित आदेशाद्वारे लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला त्याचा विपरित परिणाम जनजीवनावर होत आहे.
कोरोनाच्या वाटचालीकडे नजर टाकली तर जिल्हय़ात लॉकडाऊन सुरु असताना असणार्या नागरिकांपैकी केवळ 2 टक्के लोकांना संसर्ग झाला होता. अनलॉकनंतर बाहेरुन आलेल्या लोकांमध्ये बाधित होण्याचे प्रमाण मोठे असून त्याला गर्दी कारणीभूत नाही. तसे पाहिले तर पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्हय़ात रुग्ण संख्या वाढत असताना तेथील मार्केट 9 ते 7 असे सुरु आहे. त्यामुळे सातारा शहरासह जिल्हय़ातील आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 7 सुरु करण्यास सोशल डिस्टनचे नियम पाळून परवानगी द्यावी, अन्यथा व्यापारी मंगळवारपासून प्रशासनांच्या सूचनांचे पालन करुन आस्थापना सुरु ठेवाव्या लागतील, असा इशारा निवेदनात दिला आहे.