नरेंद्र मोदी सरकारकडून कोरोनाचा समर्थपणे मुकाबला – माधव भंडारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त कामगिरीचा आढावा

स्थैर्य, सातारा, दि. 16 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. कोरोनाचा प्रभावी मुकाबला , प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची यशस्वी अंमलबजावणी, आत्मनिर्भर भारतासाठी कल्पक उपाययोजना आणि देशातील अनेक दशकांच्या समस्या सोडविणारे ऐतिहासिक निर्णय हे या वर्षाचे वैशिष्ट्य आहे , असे प्रतिपादन महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी आज सातारा येथे केले.

मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी आ. जयकुमार गोरे, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरसेवक विकास गोसावी, धनंजय जांभळे, विठ्ठल बलशेटवार आदी मान्यवर उपस्थित होते.

माधव भांडारी म्हणाले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने कोरोनाच्या जागतिक साथीचा प्रभावी मुकाबला केला आहे. भारताची लोकसंख्या आणि कोविडचा सर्वाधिक फटका बसलेल्या १४ देशाची एकत्रित लोकसंख्या जवळपास सारखीच आहे. मात्र एकसारखीच लोकसंख्या असूनही जून २०२० ला या १४ देशांमधील एकत्रित लोकसंख्येपैकी कोविडचा संसर्ग झालेल्यांची संख्या भारताच्या २२.५ पट अधिक आहे . या १४ देशांमध्ये कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही भारतातील मृत्यूसंख्येच्या तुलनेत ५५.२ पट इतकी आहे. वेळीच लागू केलेला देशव्यापी लॉकडाऊन, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी झटपट वैद्यकीय सुविधा निर्माण करणे आणि रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यामुळे हे शक्य झाले आहे . पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन जनतेने देशभरात लॉकडाऊनचे पालन केल्यामुळेच कोरोनाचा प्रसार रोखणे शक्य झाले.

ते पुढे म्हणाले की , कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे झळ बसलेल्या दुर्बल घटकांना मदतीसाठी केंद्र सरकारने तातडीने १ लाख ७० हजार कोटींचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. आतापर्यंत सुमारे ४२ कोटी गरजूंना ५३,२४८ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. कोट्यवधी लोकांना मोफत धान्य, शेतकऱ्यांना खात्यात थेट पैसे जमा करणे, गरीब कुटुंबांना मोफत गॅस सिलिंडर देणे, जनधन खाते असलेल्या महिलाना तसेच गरीब ज्येष्ठ नागरिक , विधवा व दिव्यांगांना थेट आर्थिक मदत करणे असे उपाय केंद्र सरकारने केले. त्यांनी सांगितले की , देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करून देश आत्मनिर्भर करण्यासाठी वीस लाख कोटी रुपयांचे पॅकेज मोदी सरकारने जाहीर केले. त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीने शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठीच्या कायदेशीर सुधारणेसह अनेक महत्त्वाच्या आर्थिक सुधारणाही जाहीर करण्यात आल्या, शेतकरी, लघू उद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देऊन अर्थचक्र गतीमान करण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या पॅकेजमुळे देश कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल.

ते म्हणाले की , गेल्या वर्षभरात मोदी सरकारने जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारे घटनेचे कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाकवर बंदी घालणे, अयोध्या येथे राम मंदिराच्या बांधकामासाठी ट्रस्ट स्थापन करून बांधकाम सुरु करणे तसेच पाकिस्तान , बांगलादेश व अफगाणिस्तानमधील पीडीत धार्मिक अल्पसख्यांकांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा असे महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय घेतले.  गेली अनेक दशके ज्यांची देशवासियांना आस होती, असे अनेक महत्वाचे निर्णय या सरकारने घेतले आहेत आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली आहे असल्याचे ते म्हणाले.

राज्य सरकारच्या सध्याच्या कामगिरीबाबत ते म्हणाले की, भाजपच्या वतीने सरकारला लोकहिताच्या सूचना करण्यात येत आहेत. सध्या राज्यात कोरोना मुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. ही परिस्थिती राज्य सरकारने गांभीर्याने हाताळावी असेही ते म्हणाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!