राज्यपालांच्या हस्ते कोरोना रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.३१: ठाणे शहर व परिसरातील कोरोना रुग्णांना मोफत रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (दि. ३१) राजभवन येथे हिरवी झेंडी दाखवून करण्यात केले.

रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमाला आमदार संजय केळकर, माजी खासदार संजीव नाईक, जय फाऊंडेशनचे संस्थापक धनंजय सिंह सिसोडिया, महाराणा प्रताप राजपूत महासंघाचे अध्यक्ष अमर सिंह ठाकूर व धनंजय सिंह सिसोडिया यांच्या मातोश्री श्रीमती लालमंती रामलोचन सिंह प्रामुख्याने उपस्थित होते.

कोरोनामुळे जगभर लाखो लोक अकाली मृत्युमुखी पडले. आज देखील अनेक लोक इस्पितळात भरती आहेत. अनेक लोकांना रुग्णवाहिकेची मदत हवी आहे. अशावेळी कोरोनामुळे निधन झालेल्या आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजाला रुग्णवाहिका भेट देऊन धनंजय सिंह सिसोडिया यांनी पुण्य कार्य केले आहे. रुग्णवाहिका कोरोना काळात गोरगरीब रुग्णांना तसेच कोरोना संकट गेल्यानंतर देखील गरजू लोकांना सेवा देत राहील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

सदर रुग्णवाहिका ठाणे परिसरातील गरजू कोरोना रुग्णांना मोफत सेवा देणार असल्याची माहिती श्री. सिसोडिया यांनी यावेळी दिली.


Back to top button
Don`t copy text!