सातारा शहरात पुन्हा संक्रमणाचे सावट : आरोग्य पथकाचा पुन्हा सर्वे सुरू
स्थैर्य, सातारा, दि. 1 : पोवई नाका भाजी मंडईच्या पिछाडीला असलेल्या रविवार पेठेतील भाजी विक्रेत्याला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यावर परिसरात खळबळ उडाली. भाजी विक्रेता रुग्णाला त्याची कोल्हापूर वारी भलतीच महागात पडली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने मंडई लगतच्या परिसराच्या निर्जंतुकीकरणाचे काम तातडीने हाती घेतले आहे.
सातारा तालुक्यात करोनाचे संक्रमण वाढत असताना तुलनेने सातारा शहरात करोनाचा रुग्ण नाही हा समज वारंवार खोटा पडत चालला आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नागरिकांचे सुटलेले भान, पुणे मुंबईकरांचा सातार्यात वाढता वावर, आंतरजिल्हा झालेला प्रवास अशा विविध कारणांमुळे करोनाची साखळी तुटता तुटेना. सातार्यात करोनाचा हॉटस्पॉट ठरलेली रविवार पेठ पुन्हा एकदा कोरोनाचे लक्ष्य ठरली. पोवई नाका भाजी मंडईच्या पिछाडीला असणार्या अरूंद नागरी वस्तीमध्ये एका भाजी विक्रेत्याला करोनाची बाधा झाल्याचा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला आणि रविवार पेठेत एकच खळबळ उडाली. भाजी विक्रेता दि. 24 जून रोजी कोल्हापूरला काही कारणासाठी गेला होता. तेथून परतल्यावर त्यांला करोना सदृश्य लक्षणे जाणवू लागली. खाजगी दवाखान्यात उपचार घेतल्यावर सोमवार, दि. 29 रोजी भाजी विक्रेत्याने जिल्हा रुग्णालयात जाऊन घशातील स्त्रावाचा नमुना दिला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाली. सातारा पालिकेतील कोविड कक्षाचे प्रमुख प्रणव पवार आणि त्यांचे पथक मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या सूचनेनंतर तत्काळ 186 रविवार पेठ येथे रवाना झाले. परिसराची तत्काळ स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली. अग्निशमन दलाची यंत्रणा मागवून संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेण्यात आले.
रविवार पेठेतील पंताचा गोट परिसर हा सतत हाय रिस्क झोन ठरला आहे. यापूर्वी सुध्दा या परिसरात दोन रुग्ण कोरोना बाधित आढळून आले होते. या परिसरात प्रचंड अरूंद गल्ल्या असून हातावर पोट असणारा श्रमजीवी वर्ग येथे भाडे तत्वावर राहतो. भाजी विक्रेत्याच्या घरी पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. आरोग्य पथकाने तातडीने हाय रिस्क व लो रिस्क झोनमधील संपर्कातील व्यकतींची शोध मोहिम सुरू केली होती. इन्सिडंट कमांडर प्रांत मिनाज मुल्ला यांना कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यासाठी सदर माहितीचा अहवाल सादर करण्यात आला. भाजी विक्रेत्याच्या संपर्कातील व्यक्ती मात्र या बाधा प्रकरणामुळे प्रचंड तणावात आहे. या पेठेत नक्की किती व्यक्ती क्वारंटाईन झाल्या हे मात्र समजू शकले नाही.