
स्थैर्य, फलटण, दि. 6 नोव्हेंबर : मौजे फरांदवाडी येथील काळुबाईनगर ते तांबमाळ रस्त्यालगत असलेल्या एका इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४० हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेली. ही घटना दि. ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ ते सकाळी १०.२० च्या दरम्यान घडली.
या घटनेत चोरट्यांनी ‘गांधी इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर’ (क्रमांक ४११४२५३) चे नुकसान केले. या तोडफोडीत ट्रान्सफॉर्मरमधील सुमारे १०० लिटर ऑईल सांडून नुकसान झाले आहे. चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मरमधील अंदाजे ५० किलो वजनाची, ४० हजार रुपये किमतीची तांब्याची तार चोरून नेली.
याप्रकरणी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) फलटण शहर शाखेतील तंत्रज्ञ महेश प्रकाश काकडे (वय ४६, रा. फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
काकडे यांच्या तक्रारीवरून, अज्ञातांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि भारतीय विद्युत अधिनियमाच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा (नोंदणी क्र. ३५५/२०२४) दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राणी फाळके करत आहेत.

