
स्थैर्य, फलटण, दि. ४ ऑक्टोबर : तालुक्यातील फरांदवाडी येथील तांबमाळ रस्त्यालगत असलेल्या रेल्वेच्या इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरमधून अज्ञात चोरट्याने सुमारे २५ हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना दि. २ ऑक्टोबर रोजी दुपारी १ ते दि. ३ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.१५ च्या दरम्यान घडली.
चोरट्याने प्रथम इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील सुमारे १०० लिटर ऑईल सांडून नुकसान केले आणि त्यानंतर आतील ५० किलो वजनाची कॉपर वायर चोरून नेली.
याप्रकरणी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी हणमंत भिसे (वय ४०, रा. कांबळेश्वर) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार बी. आर. साबळे करत आहेत.