मराठी साहित्य संमेलन कामकाजासाठी समन्वय समिती गठीत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नाशिक, दि.८: नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी विचारात घेत विभागांमधील समन्वयाकरिता सर्वसमावेशक समिती स्थापित करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली.

कोविड-19च्या पार्श्वभूमीवर हे संमेलन होणार असल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात विविध शासकीय व पोलीस विभागाच्या परवानग्या मिळवणे, तसेच साहित्य संमेलनास आवश्यक सहकार्याच्या दृष्टीने नोडल अधिकारी म्हणून यापूर्वीच उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांची नियुक्ती झाली आहे. ते या समन्वय समितीचे मुख्य समन्वयक राहतील. याकरिता शिबीर कार्यालयही कार्यान्वित झाले आहे. ही समिती सर्वसमावेशक असल्याने संपूर्ण संमेलन काळात समन्वयाचे संपूर्ण काम करेल, असेही शिबीर कार्यालयाद्वारे काढलेल्या आदेशात पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी नमूद केले आहे.

समिती सदस्यांमध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, सहाय्यक कामगार आयुक्त एस. टी. शिर्पे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, कार्यकारी अभियंता नाशिक शहर-1 धनंजय दीक्षित, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत, सहाय्यक पोलीस आयुक्त नवलनाथ तांबे, अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर व साहित्य संमेलन मंडळांच्या 2 सदस्यांचा समावेश राहणार आहे.

बालकट्टा, बालआनंद मेळावा भरणार

नाशिकमध्ये होणाऱ्या 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बालआनंद मेळावा हे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. त्याचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच बालकट्टा, बालकवी संमेलन, कथाकथन आणि बाललेखकांशी संवाद असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. नाशिक शहरात 26 ते 28 मार्च या कालावधीत 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. यात बालकट्टा व बालआनंद मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तीनदिवसीय साहित्य संमेलनात बालकवी संमेलन, कथाकथन आणि बाललेखकांशी संवाद यांचाही समावेश राहणार आहे. या माध्यमातून बालवाचकांमधून लेखक घडावेत, असा प्रयत्न करण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!