
दैनिक स्थैर्य । 06 मे 2025। फलटण । श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्काराचे वितरण करण्यात येते. प्रतिवर्षी राज्यामधील विविध क्षेत्रात कामकाज केलेल्या मान्यवरांना श्रीमंत मालोजीराजे स्मुर्ती पुरस्कार हा वितरण करण्यात येतो. सन २०२५ साली वितरित होणारा श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार हा सहकार महर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांना जाहीर झाला असून डॉ. विनय कोरे (सावकार) हे पुरस्कार स्वीकारणार आहेत.
प्रतिवर्षी श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने “श्रीमंत मालोजीराजे, श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे” आयोजन करण्यात येते. यंदा दि. १४ मे ते दि. २५ मे दरम्यान श्रीमंत मालोजीराजे, श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर (राजेसाहेब, फलटण) यांची ४७ वी पुण्यतिथी व श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांची १०० जयंती बुधवार दि. १४ मे २०२५ ते रविवार दि. २५ मे २०२५ या कालावधीत साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.