दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । पुणे । पिंपरी चिंचवड महापालिकेचा विज्ञान आविष्कार नगरी विकसित करण्याचा प्रकल्प स्तुत्य असून याला मूर्त स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी सादरीकरण तयार करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने नव्याने विकसित होणाऱ्या विज्ञान आविष्कार नगरीबाबत सायन्स पार्क येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, शालेय शिक्षण व क्रीडा सचिव रणजितसिंह देओल, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आयुक्त सुहास दिवसे, समग्र शिक्षण राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शिक्षण सल्लागार डॉ. सतीश वाडकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सायन्स पार्कचे संचालक तथा महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त प्रविण तुपे, शहर अभियंता मकरंद निकम तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री.केसरकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात विज्ञान पार्कला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी विज्ञान पार्कचे संचालक श्री. तुपे यांनी या प्रकल्पाविषयी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी प्रस्तावित प्रकल्प उभारणीच्या अनुषंगाने जागेसंदर्भात माहिती दिली.
खगोल शास्त्राच्या अभ्यासाकरीता चिंचवड येथील विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. दरवर्षी सुमारे ३ लाखांहून अधिक विद्यार्थी व नागरिक विज्ञान पार्कला भेट देत असतात. तसेच याठिकाणी तारांगण उभारण्यात आले आहे. विज्ञान विषयक आणि खगोलशास्त्र विषयक माहिती एकाच जागेत विद्यार्थी आणि नागरिकांना मिळण्यासाठी तारांगणाची उभारणी महापालिकेने केली आहे. यासोबतच आता शहरामध्ये विज्ञान आविष्कार नगरी उभारण्यात येणार आहे.