
स्थैर्य, फलटण, दि. 30 सप्टेंबर : फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.च्या ७० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने, साताऱ्याचा अभिमान असलेल्या ‘कूपर ट्रॅक्टर’च्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट देऊन ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये जाणून घेतली व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कूपर ट्रॅक्टरची अधिकृत डिलरशिप ‘आधार कंपनी’ यांच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनास विधानपरिषदेचे माजी सभापती, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार दिपक चव्हाण यांनी सौजन्यपूर्ण भेट दिली.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॅक्टरचे औपचारिक सादरीकरण करण्यात आले. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ट्रॅक्टरची सविस्तर पाहणी करून त्याच्या वैशिष्ट्यांबद्दल समाधान व्यक्त केले.
श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक तसेच श्रीराम-जव्हार प्रोजेक्टच्या व्यवस्थापकांनीही प्रदर्शनास भेट देऊन यशस्वी आयोजनाबद्दल ‘आधार कंपनी’चे अभिनंदन केले.