दैनिक स्थैर्य । दि. २१ एप्रिल २०२२ । मुंबई । किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या नैसर्गिक, विषमुक्त शेतीसारख्या योजना शेतकऱ्यांपर्यंत नेऊन पोचवाव्या तसेच या योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे ना याकडे लक्ष ठेवावे असे आवाहन भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राजकुमार चाहर यांनी गुरुवारी केले. प्रदेश किसान मोर्चाच्या प्रदेश कार्यसमिती बैठकीत ते बोलत होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील, मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बन्सीलाल गुर्जर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, सरचिटणीस श्रीकांत भारतीय, किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ अनिल बोंडे, प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे आदी यावेळी उपस्थित होते.
खा. चाहर म्हणाले की, आगामी काळात संघटन मजबूत करण्यासाठी केंद्राच्या सर्व योजनांचा अभ्यास कार्यकर्त्यांनी करायला हवा. याबरोबरच मोदी सरकारच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचतो आहे की नाही याकडेही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मंडलात आपण पोहचले पाहिजे. त्या ठिकाणी मुक्काम केला पाहिजे. राज्यातील आघाडी सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. या सरकारला शेतकरी मतपेटीतून योग्य उत्तर देतील.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी आघाडी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्य सरकार कमिशनच्या हव्यासापोटी विजेची कृत्रिम टंचाई निर्माण करत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल या बैठकीत आघाडी सरकारचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुधाकर भोयर, मकरंद कोरडे, आनंदराव राऊत तसेच प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.