दैनिक स्थैर्य । दि. २१ फेब्रुवारी २०२२ । फलटण । शब्द हे शस्त्र आणि भाषा हे शास्त्र आहे, आपण एकमेकांशी बोलताना शब्द आणि भाषा विचारपूर्वक व आदरपूर्वक बोललो तर संभाषण कला चांगल्या पद्धतीने विकसित होऊ शकते असे प्रतिपादन ईश्वर कृपा शिक्षण संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे यांनी केले आहे.
भाषेचा विकास व्हावा व चांगल्या भाषणातून संभाषण कला वृद्धिंगत व्हावी यासाठी ईश्वर कृपा शिक्षण संस्था संचलित ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कूल, गुणवरे येथे शिवजयंती निमित्त संभाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे यांनी वरील मत व्यक्त केले. ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ईश्वर तात्या गावडे व प्राचार्य गिरीधर गावडे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी छ. शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित भाषणे, कविता व पोवाडे सादर केले. यानंतर झालेल्या संभाषण स्पर्धेमध्ये इयत्ता १ ली ते ८ वी तील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सर्व विद्यार्थ्यांनी संभाषण इंग्रजी भाषेतून केले. संभाषणाच्या विषयानुसार पोषाख परिधान करुन संभाषण सादर केले.
प्रशाळेचे प्राचार्य गिरीधर गावडे यांनी आपल्या मनोगतात चांगल्या संभाषणातून चांगले विचार प्रकट होतात व चांगले विचार प्रकट झाले की वाईट विकार नाहीसे होतात म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी चांगले संभाषण करण्याची सवय अंगी बाणवली पाहिजे असे आवाहन केले.
रमेश सस्ते सर यांनी सूत्रसंचालन, आणि समारोप व आभार बाळासाहेब मोरे सर यांनी मानले. पालक, विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.