फलटण शहरातील भटक्या कुत्र्यांचा व बेवारस गुरांचा बंदोबस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा – अशोकराव जाधव

आठ दिवसांत कारवाई न झाल्यास भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या महायुतीमार्फत नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन छेडणार


स्थैर्य, फलटण, दि. १९ ऑगस्ट : फलटण शहरामध्ये भटकी कुत्री आणि बेवारस जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगर परिषद प्रशासनाने येत्या आठ दिवसांत याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अन्यथा महायुतीतील सर्व घटक पक्षांच्या वतीने नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी दिला आहे.

शहरातील परिस्थितीवर बोलताना अशोकराव जाधव म्हणाले की, विविध चौकांमध्ये १० ते १५ भटक्या कुत्र्यांची टोळकी जमलेली असतात, तर मुख्य रस्त्यांवर आणि रहदारीच्या ठिकाणी बेवारस जनावरांचे कळप बसलेले दिसतात. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही जनावरे आता रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर, विशेषतः लहान मुलांवर आणि महिलांवर हल्ले करू लागली आहेत, ज्यामुळे एखाद्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

एखाद्या नागरिकाचा किंवा लहान मुलाचा जीव गेल्यानंतरच नगर परिषद प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार आहे का? असा संतप्त सवाल अशोकराव जाधव यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळ न करता प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून या समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली.

जर आठ दिवसांच्या आत यावर ठोस कारवाई झाली नाही, तर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीमार्फत नगर परिषदेच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!