
स्थैर्य, फलटण, दि. 25 ऑगस्ट : आगामी गणेशोत्सवाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईट्सच्या वापरावर नियंत्रण आणावे, अशी मागणी ‘फलटण ज्येष्ठ नागरिक सुरक्षा दक्षता कमिटी’ने शहर पोलिसांकडे केली आहे. या ध्वनी व प्रकाश प्रदूषणामुळे वृद्ध, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे कमिटीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
ज्येष्ठ नागरिक समितीचे अध्यक्ष शांताराम विष्णू आवटे आणि जिल्हा समन्वयक आनंदराव रामचंद्र शिंदे यांनी फलटण शहर पोलीस निरीक्षकांना या संदर्भात एक लेखी निवेदन दिले आहे. येत्या बुधवार, दि. २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या काळात मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान बालके, रुग्ण आणि गर्भवती महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
हा केवळ उत्सवाचा भाग नसून एक गंभीर सामाजिक आणि आरोग्याचा प्रश्न आहे, असे नमूद करत, पोलिसांनी यात गांभीर्याने लक्ष घालून योग्य ती खबरदारी घ्यावी आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी विनंती समितीने केली आहे.