दैनिक स्थैर्य । दि. २८ सप्टेंबर २०२१ । सातारा । पोषण विषयक असलेले उपक्रम अंगणवाडयांच्यावतीने राबवून तळागाळापर्यंत पोहोचवले जात आहेत. अंगणवाडीच्या माध्यमातून कुपोषण मुक्तीसाठी होणारा प्रयत्न हा वाखाणण्याजोगा आहे. अंगणवाड्यांमुळेच जिल्हा कुपोषण मुक्तीसाठी मोठा हातभार लागत आहे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत शाहूपुरी बिटच्यावतीने आयोजित राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रमात आ.शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. विद्या देवरे, नगरसेवक विजय काटवटे, सौ.सुवर्णा पाटील, राजू गोरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी संदीप भिंगारे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष काका पाटील, मेघा चक्के, बिपिन सूर्वे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते बालकांना पौष्टिक खाऊ व औषधांचे वाटप, तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या सेविका व मदतनिसांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सौ.सुवर्णा पाटील व मेघा चक्के यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडीतील महिलांनी पोषण विषयक संदेश देणाऱ्या रांगोळ्या व पथनाट्य सादर केले.
कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षिका सौ.रोहिणी सत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सेविका व मदतनिसांनी केले. यावेळी माणदेशी फाऊंडेशनच्या प्रतिनिधी प्रतिक्षा सावंत, ऋतुजा काळे, अॅड. नीलिमा कदम, डॉ.आरती सोमन, पर्यवेक्षिका सुवर्णा कणसे, सरपंच अमोल जाधव, योगेश चव्हाण, सुरज जांभळे, समीर शिंदे, अशोक जांभळे आदी उपस्थित होते.