दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२१ । सातारा । शहापूर पाणी पुरवठा योजनेच्या तांत्रिक देखभालीचे काम करणाऱ्या सातारा इलेक्ट्रीकल या ठेकेदार फर्मला काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या पालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला . केवळ वीस मिनिटाच्या या सभेमध्ये तीन विषय रद्द करून एकूण 397 विषयांना मंजूरी देण्यात आली.
मात्र, बहुतांश विषयांना निधी उपलब्ध नसताना तसेच त्याच्या टिप्पण्या परिपूर्ण नसताना मारुतीच्या शेपटागत लांबणार्या जंत्री प्रमाणे विषय मंजूर करण्यात काय हशील आहे ? अशी खरमरीत काही नगरसेवकांनी खाजगीत केली. सातारा पालिकेच्या स्थायी समितीची यंदाच्या पंचवार्षिक हंगामातील शेवटची सभा पालिकेच्या कमिटी हॉलमध्ये मंगळवारी सकाळी अकरा वाजता पार पडली. सभेच्या अध्यक्ष स्थानी नगराध्यक्ष माधवी कदम होत्या. स्थायी समितीच्या अजेंड्यावर तब्बल चारशे विषय मंजूरीला ठेवण्यात आले होते. सभासचिव भोसले मॅडम ऐवजी सर्वसाधारण सभेचे सचिव अतुल दिसले सुरवातीला पाच विषयांचे वाचन केले. स्थायी समिती सदस्य ॲड. दत्ता बनकर यांनी केवळ महत्वाच्या विषयांवरच चर्चा करू अशी सूचना करत या अजेंड्या विषयी कोणाची तक्रार आहे का ? याची विचारणा केली. शहापूर पाणी पुरवठा योजनेचे एकूण चार विषय मंजूरीला आले होते. विरोधी पक्षनेते अशोक मोने यांनी या विषयाला निधी उपलब्ध आहे का ? याची विचारणा केली. नगराध्यक्षां नी फंड उपलब्ध असल्याचे सांगितले . या योजनेचे तांत्रिक काम पाहणाऱ्या सातारा इलेक्ट्रीक्स या फर्मच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती . प्रत्यक्ष तांत्रिक व्यवस्था व उपलब्ध मनुष्यबळ यांच्यात मुख्याधिका ऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणीत तफावत आढळली. हा मुद्दा बैठकीत चर्चेला आल्यावर संबधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून सेकंड लोएस्ट दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदाराला शहापूर चा ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला. वॉर्ड क्रं १५ मधील रस्त्याचे क्रॉक्रिटीकरण व गटारकाम हे दोन विषय सात व्या आणि आठव्या क्रमांकाने घेण्यात आले होते मात्र निधी नसल्याने ते रद्द झाले. नगरसेवक निशांत पाटील यांच्या सूचनेवरून सुमित्राराजे उद्याना समोरील जागेत आयलँड विकसित करण्याचा विषय जागा अरुंद असल्याने रद्द करण्यात आला.
अजेंड्यावरील एकूण 397 विषयांना अवघ्या वीस मिनिटात मंजूरी देण्यात आली. पालिकेची यंदाच्या पंचवार्षिक कालावधीतील ही सभा तशी शेवटचीच होती . यापूर्वीची ऑफलाईन स्टॅडिंग 29 मार्च 2021 रोजी झाली होती. तब्बल साडेनऊ महिन्याच्या कालावधी नंतर होणाऱ्या या ऑफलाईन सभेत साधक बाधक चर्चा होणे अपेक्षित होते. विरोधी पक्षनेते अशोक मोने यांच्याकडून तरी शेवटची सभा घमासान चर्चेतून गाजविली जाईल अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात मोने काही जुजबी प्रश्न विचारून मौन बाळगणे पसंत केले . बहुतांश विषयाच्या टिप्पण्या नसणे, विषय अपूर्ण असणे, कागदपत्रांची अपूर्तता अशा अनेक तक्रारी पालिकेच्याच कर्मचार्यांनी खाजगीत केल्याने सत्ताधारी सातारा विकास आघाडीने केवळ विषय मंजूरींचा कागदी फार्स केल्या चा आरोप करण्यात येत आहे.