दैनिक स्थैर्य | दि. २३ जानेवारी २०२५ | फलटण | फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या कारभाराविरोधात ठेकेदार यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. ठेक्याची मुदत कालावधी संपलेला नसतानाही मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी बेकायदेशीर निविदा काढल्या असून याप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व न्यायालयात दाद मागणार असल्याचे बाळासो अमृत जानकर, अमोल अशोक पवार, प्रशांत विजय शिंदे व अनिल रामचंद्र लोखंडे यांनी सांगितले आहे.
याबाबत संबंधित ठेकेदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिटी सर्व्हे नंबर ६४८४ लक्ष्मीनगर बगीचा, लक्ष्मीनगर नाना नानी पार्क बगीचा, महतपुरा पेठ येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उद्यान व सर्व्हे नंबर १११ मधील बगीचा, सिटी सर्व्हे नंबर १९०७ शनीनगर बगीचा याबाबत फलटण नगर परिषद यांनी प्रशासकीय सभा घेऊन यापूर्वी निविदा मंजूर केल्या होत्या, त्यानुसार संबंधित ठेकेदार यांनी अनामत रक्कम भरुन मुख्याधिकारी यांनी करारनामा करून दिला होता. त्यानुसार संबंधित ठेकेदार यांना कामाचे आदेश नगरपरिषदेकडून देण्यात आले होते. त्यानुसार वरील बागबगीचे देखभालीचे काम संबंधित ठेकेदार यांना मिळाले होते. संबंधित ठेकेदार उत्तमप्रकारे देखभाल करत होते, फलटण नगर परिषदेमधील पदाधिकार्यांचा कार्यकाल संपल्यानंतर महाराष्ट्र शासनाने नगर परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्याधिकारी यांची नेमणूक केली होती.
त्यानंतर मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी यापूर्वी मंजूर झालेल्या निविदेचा कालावधी संपला नसतानाही संबंधित ठेकेदारांचा ठेका तसाच चालू न ठेवता दिनांक २०/०१/२०२५ रोजी वार्षिक निविदा दैनिक पुण्यनगरी व दैनिक गंधवार्तामध्ये प्रसिद्ध केली असून यामध्ये वरील उद्यानासाठी एक वर्षाची निविदा प्रसिद्ध करण्याचा आदेश काढला आहे. मुळात सदर उद्यानाच्या देखभालीचा ठेका यापूर्वीच आम्हाला मिळाला असल्याने तसेच त्याचा कालावधी संपला नसतानाही मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी चुकीच्या पद्धतीने हुकूमशाही करत जाहीर निविदा काढण्याचा घाट घातला असल्याचा आरोप संबंधित ठेकेदार यांनी केला आहे.
सिटी सर्व्हे नंबर ६४८४ लक्ष्मीनगर बगीचा ठेका मुदत २०२६ अखेर, लक्ष्मीनगर नाना नानी पार्क बगीचा ठेका मुदत ३१/०३/२०२६, महतपुरा पेठ येथील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उद्यान व सर्व्हे नंबर १११ मधील बगीचा ठेका मुदत ०१/०२/२०२७, सिटी सर्व्हे नंबर १९०७ शनीनगर बगीचा ठेका मुदत ३१/०३/२०२६ असताना चुकीच्या पद्धतीने काम करत आमचे आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने बेकायदेशीररीत्या हा नवीन ठेका काढण्याचा डाव मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी घातला आहे.
फलटण नगरपरिषद व ठेकेदार यांच्यामध्ये करारनामा झाला असून करारनामाच्या अटीस फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी कायदेशीर दुर्लक्ष केल्याने संबंधित चार ठेकेदार यांनी फलटण दिवाणी न्यायालयात मुख्याधिकारी निखिल मोरे व नगरपरिषद यांचे विरोधात कायदेशीर दाद मागण्याचे ठरवले आहे. याबाबत कायदेशीर नोटीस मुख्याधिकारी निखिल मोरे यांना बजावली असल्याची माहिती संबंधित ठेकेदार यांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्रीएकनाथ शिंदे यांच्याकडेही दाद मागणार असल्याचे संबंधित ठेकेदार यांनी सांगितले आहे.
वरील प्रकरणी बेकायदेशीररीत्या काढलेली वार्षिक निविदा मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी तत्काळ मागे घ्यावी, असे आवाहन संबंधित ठेकेदारांनी केले आहे. तसे न केल्यास नगर परिषदेसमोर आम्ही आमच्या कुटुंबांसमवेत आमरण उपोषणास बसणार असल्याचे संबंधित ठेकेदारांनी सांगितले आहे.