
नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांचे आवाहन
स्थैर्य, फलटण, दि. २७ सप्टेंबर : फलटण शहर आणि तालुक्यात काल, शुक्रवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाकडून आज, शनिवारसाठी तालुक्याला ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.
काल सकाळपासून फलटणमध्ये पावसाला सुरुवात झाली असून, दिवसभरात काही काळ वगळता पाऊस सतत सुरू आहे. आजही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी कोणतीही जोखीम पत्करू नये, आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले आहे. प्रशासकीय यंत्रणाही सतर्क झाली असून, खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी सांगितले.

