
स्थैर्य, गिरवी, दि. १५ सप्टेंबर: फलटण तालुक्यातील गिरवी आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने थैमान घातले असून, शेतीचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने भाजीपाला, कडधान्ये आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
या मुसळधार पावसामुळे शेतातील मेथी, कोथिंबीर, पालक यांसारखा भाजीपाला, तसेच घेवडा, गवार, भेंडी, वांगी, कांदा यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुग, मटकी, उडीद, सोयाबीन आणि मका ही पिके पाण्याखाली गेल्याने सडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सततच्या पावसामुळे ऊस, द्राक्षे आणि डाळिंब बागायतदार शेतकरीही संकटात सापडले आहेत. सततच्या पावसामुळे आणि जमिनीत पाणी साचल्याने पिकांवर मूळकूज, खोडकूज आणि हुमणीसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
या पावसाचा फटका केवळ पिकांनाच बसला नसून, पशुपालकांनाही बसला आहे. जनावरांचा चारा भिजल्याने जनावरांच्या आरोग्याचा आणि खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. भिजलेल्या चाऱ्यामुळे दुभत्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटली आहे, तर दुसरीकडे उत्पादन खर्च वाढल्याने दूध उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत.
यावर्षी अनेकदा अवेळी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. आता पुन्हा एकदा पावसाने पिकांचे नुकसान केल्याने, शासनाकडून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई कधी मिळणार, असा सवाल नुकसानग्रस्त शेतकरी विचारत आहेत.