
दैनिक स्थैर्य । 25 मे 2025। सातारा। जिल्ह्यात उन्हाळा असूनही पावसाळी स्थिती निर्माण झालेली आहे. कारण, मागील पाच दिवसांपासून आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. सातारा शहरात तर पावसाची संततधारच आहे. त्यामुळे नागरिकांना सूर्यदर्शनही होईना. तसेच जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होत असून सकाळपर्यंतच्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 43.9 मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्याच्या सुमारास वातावरणात बदल झाला. त्यानंतर ढगाळ वातावरण तयार होत गेले. तर 15 मे नंतर वळीवाचा पाऊस पडण्यास सुरूवात झाली. मात्र, सोमवारपासून जिल्ह्यात धुवाधार पाऊस पडत आहे. या पावसाला उसंत नाहीच. सातारा शहरात तर दिवस-रात्र पाऊस पडू लागला आहे. मागील चार दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यातच सकाळपासूनही शहरासह परिसरात पाऊस पडत होता. परिणामी नोकरदारांचे हाल झाले. तसेच नागरिकांनाही पावसामुळे घराबाहेर पडता आले नाही. जिल्ह्यातीलही अनेक भागात दमदार पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेळेतच सुरुवात होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठपर्यंतच्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 43.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक पाऊस जावळी तालुक्यात 107.3 मिलिमीटर पडला.महाबळेश्वर तालुक्यात 103 मिलिमीटर तसेच वाई तालुका 78, सातारा 65.5, पाटण 44.5, कोरेगाव 43.9, खंडाळा तालुक्यात 43.3 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर दुष्काळी माण तालुक्यात 10.2, खटावला 13.1 मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी
पुणे-बंगळूर महामार्गावर शेंद्रेपासून कोल्हापूरकडे जाणार्या रस्त्यावर शुक्रवारी वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. तब्बल दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक अक्षरशः वैतागून गेल्याचे पहायला मिळाले.
यवतेश्वर घाटात दरड कोसळली
सातार्याकडून कास पठाराकडे जाणार्या रस्त्यावर रात्री उशिरा दरड कोसळली आहे. रात्री उशिरा ही दरड कोसळल्याने अद्याप या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकले नाही. सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असून, वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या घाटातून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ सुरू असते. कास, बामणोली तसेच अनेक गावांकडे जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असल्याने पर्यटक आणि प्रवासी या मार्गाचा सर्रास वापर करत असतात. त्यामुळे आता घाट रस्त्यातून प्रवास करताना वाहन धारकांना सतर्क राहावे लागणार आहे.