स्थैर्य, नागठाणे, दि. 02 : ग्वाल्हेर-बंगलोर आशियाई महामार्गावर शेंद्रे (ता. सातारा) येथे सिलिंडर घेऊन जाणाऱ्या मालट्रकला कंटेनरने पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघे जण जखमी झाले. त्यातील एका गंभीर जखमीस युवकांच्या तत्परतेमुळे उपचार मिळाले.
घटनास्थळाहून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात सिलिंडर घेऊन जाणारा मालट्रक कराड बाजूकडून सातारा बाजूकडे निघाला होता. शेंद्रे गावानजीक पाठीमागून वेगाने आलेल्या कंटेनरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कंटेनर थेट मालट्रकवर जाऊन आदळला. या अपघातात कंटेनरचालक व क्लीनर जखमी झाले. त्यातील क्लीनर गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर होती.
अशा स्थितीत शेंद्रेतील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर गायकवाड, पत्रकार सुनील शेडगे तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या युवकांनी रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. त्यानंतर रुद्रनील सोशल फाउंडेशनच्या ओंकार कदम यांनी तातडीने घटनास्थळी येत जखमींना उपचारासाठी सातारा येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.
जखमी बेशुद्धावस्थेत असल्यामुळे त्यांची ओळख समजू शकली नाही. या अपघातात सिलिंडर घेऊन चाललेल्या मालट्रकच्या चालकाने सतर्कता दाखविल्यामुळे मोठा अनर्थ टळण्यास मदत झाली.