दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२२ । सातारा । फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकाने कधीही गिराईक होवू नये. त्याने ग्राहकच रहावे कोणतेही वस्तु खरेदी करताना नेहमीच जागृत रहावे, असे आवाहन प्रभारी अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती सरदेशमुख बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष मिलींद पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते, भारतीय मान ब्युरोच्या निशा कुलबुर्गी आदी उपस्थित होते.
श्रीमती सरदेशमुख म्हणाल्या, आपण आज सर्वच क्षेत्रात पुढे आहोत. ग्राहकांसाठी असणारे हक्क याबाबत ग्रामीण भागात म्हणावी तशी जनजागृती झाली नाही. यापुढे ग्रामीण भागात जनजागृती करावी. प्रत्येक ग्राहकाने आपल्याला काय हक्क आहेत आपली जबाबदाऱ्या काय याची माहिती घेऊन सदैव जागृत राहिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
ग्राहकांची फसवणूक झाल्यास ग्राहकांनी तात्काळ जिल्हा ग्राहक आयोगाकडे तक्रारी करावी. जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघावीत म्हणून मध्यस्थी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ऑनलाईन खरेदीवर ग्राहकांचा कल वाढत आहे. यातूनही फसवणुकीचे प्रकार पुढे येत आहेत. फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी ग्राहकांनी सुजान व सजक ग्राहक बनावे, असे आवाहन जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष मिलींद पवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पथकनाट्याद्वारे ग्राहकांच्या जागृती करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते लाभार्थींना शिधापत्रिकेचेही वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक, महिला उपस्थित होत्या.