स्थैर्य, सोलापूर, दि.२४: ग्राहक चळवळ अव्याहतपणे सुरु राहिली पाहिजे. नागरिकांनी ग्राहक म्हणून असणारे आपले अधिकार समजून घ्यायला हवेत, असे आवाहन आज करण्यात आले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती तंत्रज्ञान कक्षात हा कार्यक्रम झाला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य शोभना सागर, आनंद सागर आदी उपस्थित होते. या वेबिनारमध्ये तालुक्यातील अधिकारी, ग्राहक सहभागी झाले होते.
श्री. वाघमारे यांनी नागरिकांनी ग्राहक म्हणून असणारे अधिकार समजून घेतले पाहिजेत. सेवा आणि उत्पादन घेताना नेहमी सजग राहायला हवे. खराब वस्तू मिळाल्यास अथवा दर्जेदार सेवा न मिळाल्यास लगेचच त्याविरुद्ध दाद मागितली पाहिजे, असे सांगितले.
श्रीमती सागर यांनी ग्राहकांनी नेहमीच वस्तू आणि सेवा घेताना आवश्यक कागदपत्रे, पावत्या मागून घ्याव्यात. त्या जपून ठेवाव्यात उत्पादन अथवा सेवेमध्ये दोष असल्यास त्याविरुद्ध ग्राहक न्यायालयात दाद मागावी.
आनंद सागर यांनी ग्राहक संरक्षण कायद्यात झालेल्या सुधारणा आणि दुरुस्तीबाबत माहिती दिली. सध्या ऑनलाईन व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. हे व्यवहार करताना अधिकृत आणि सुरक्षीत साईटवरुनच व्यवहार करावेत, असे सांगितले.
दीपक इरकल यांनी ग्राहकांच्या हक्काबाबत नागरिकांना जाणीव जागृती होण्याची आवश्यकता आहे. यासाठी ग्राहक संरक्षण मंत्रालयाने विविध उपक्रम राबविले आहेत, असे सांगितले.
यावेळी ‘ग्राहक संरक्षण आणि ओळख’ या पुस्तकाचे प्रकाशन श्री.वाघमारे यांच्या हस्ते झाले. श्री. कारंडे यांनी प्रस्ताविकात ग्राहक दिनाचे महत्व विषद केले. यावेळी ग्राहक परिषदेचे गणेश लेंगरे, विठ्ठलराव वठारे, सुनील पुजारी, सुवर्णा शिवपूरे आदी उपस्थित होते. पुरवठा विभागाचे अव्वल कारकून हेमंत फुलारी, जयश्री हुलगेंडी, अनिल घायाळ यांनी नियोजन केले.