दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२२ । मुंबई । नेदरलँडचे महावाणिज्य दूत बार्ट डे जाँग यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उभय देशांतील व्यापार आणि महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, नेदरलँड आणि महाराष्ट्र यांचे घनिष्ठ संबंध आहेत. हे संबंध परदेशीय गुंतवणुकीत आणखी दृढ होतील. नेदरलँड हा देश भारतात परदेशी गुंतवणुकीत जगात चौथ्या क्रमांकावर असून आतापर्यंत त्यांनी 7 टक्क्यांपर्यंत गुंतवणूक केली आहे. नेदरलँडच्या काही कंपन्यांसोबत सामंजस्य करार झाले आहेत, आणखी करारासाठी मुंबईमधील मनपा आयुक्तांशी चर्चा करून समस्या दूर करून सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी श्री. जाँग यांना दिली.
महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीला वातावरण चांगले असून पायाभूत सुविधा मिळत आहेत. नेदरलँडमधील विविध डच कंपन्यांचे येथे विविध प्रकल्प सुरू असून यामध्ये महाराष्ट्र शासनाचे सहकार्य मिळण्याची अपेक्षा श्री. जाँग यांनी व्यक्त केली. ऊर्जा, बायोगॅस, आर्थिक सेवा, आरोग्य यामध्ये नेदरलँड गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
ई-कॉमर्स, फिलिप्स मशिनरी, तेल आणि ऊर्जा, आर्थिक सेवा, सेमी कंटक्टर, कन्सलटन्सी, आरोग्य आणि रोजगार अशा विविध क्षेत्रात नेदरलँडने राज्यात गुंतवणूक केली आहे.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, नेदरलँडच्या वरिष्ठ व्यापार आणि गुंतवणूक अधिकारी प्रिया अनिल उपस्थित होते.