दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२१ । फलटण । भारत हा कृषीप्रधान देश असल्याने आपल्याला शेतीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे शेती व्यवसायामध्ये आधुनिक तंत्राचा वापर करून कमी खर्चात अधिक गुणवत्तेची जास्तीत जास्त उत्पादन घेणे हे आताच्या काळामध्ये गरजेचे बनले आहे. वातावरणामध्ये होणारे बदल अवेळी किंवा पुरेसा न पडणारा पाऊस यामुळे आजचे शेतीचे भविष्य अवघड झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. शेतकरी शेतीमाल पिकवतात त्याला योग्य भाव मिळेलच असं नाही. आताच्या काळामध्ये आपण सर्वजण टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुभवावरून हे सिद्ध होत आहे. त्यामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर करून ग्राहकाला जे पाहिजे ते देता येणे गरजेचे बनलेले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण देता यावे यासाठी गोविंद मालक अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या वतीने अद्ययावत पॉलिहाऊसची निर्मिती करण्यात आली असून या ठिकाणी वेगवेगळ्या पिकांच्या उत्पादनाचे पथदर्शी प्रकल्प केले जाणार आहेत, अशी माहिती गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या प्रशिक्षण पॉलिहाऊसचे उद्घाटन प्रयोगशील शेतकरी शरद खलाटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी प्रयोगशील बागायतदार रामदास कदम, श्रीराम प्रमोटर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक उमेश नाईक निंबाळकर, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तुषार नाईक निंबाळकर, फलटण येथील प्रसिद्ध डॉ. महेश बर्वे, प्रगतशील शेतकरी विक्रम निंबाळकर, बाहुबली शहा, डॉ. प्रणव राजवैद्य, शिवतेज नाईक निंबाळकर, महेश धुमाळ, अमित मेनसे, गोविंद मिल्कच्या मेंटेनंस विभागाचे महाव्यवस्थापक गुड्डूभाई हत्तूरकर, गोविंद मिल्कच्या दुग्ध व्यवसाय विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड यांच्यासह मान्यवर या वेळी उपस्थित होते.
या प्रकल्पामधून फलटण तालुक्यासह शेजारील तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दुग्ध व्यवसायामध्ये आधुनिकता यावी व त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरात वाढ व्हावी यासाठी “गोविंद मिल्क” सातत्याने प्रयत्नशील असून मुक्त संचार गोठा, मुरघास पद्धती, हायड्रोपोनिक चारा उत्पादन, अझोला उत्पादन, औषधी बाग वनस्पती अन्वये आयुर्वेदिक उपचार पद्धती व आधुनिक चारा उत्पादन पद्धती याबाबतचे तंत्रज्ञान पशुपालकांना पोचविण्याचे काम करत आहे. तसेच तंत्रज्ञान आता शेतकऱ्यांना त्या पॉलिहाऊस मधून मिळेल असा विश्वास आहे, असेही गोविंद मिल्कचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या वेळी स्पष्ट केले.