दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२१ । सातारा । तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आपल्या तालुक्यात आणखीन कोणत्या सुविधा पाहिजेत यासाठी आमदारांनी स्वत: लक्ष घालून आणखीन सुविधा निर्माण कराव्यात, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील आढावा बैठक येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ज्या ठिकाणी कोरोनाचे टेस्टींग होते त्या ठिकाणी गर्दी होत आहे, ही गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना करुन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, जिल्ह्यामध्ये ऑक्सिंजन प्लँन्ट उभे केले जात आहेत त्यांना लवकरात लवकर कार्यान्वीत करावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कुणीही आरोग्य सुविधेपासून वंचित राहणार नाही यासाठी आत्तापासूनच तयारी करा, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.
सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधूदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमधील पॉझिव्हिटीचा रेट कमी होताना दिसत नाही ही चिंतेची बाबत आहे. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये कुठेलेही नियम पाळले जात नाही. प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे. अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये तसेच बाजार पेठांमध्ये गर्दी करुन नये, असे आवाहन पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केले.
बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.