
स्थैर्य, नाशिक, दि. १९: जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी शासनाकडून 25 कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून, या संकुलाच्या बांधकामासाठी लागणाऱ्या आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. तरी लवकरात लवकर मूळ आराखड्यानुसार क्रीडा संकुलाचे बांधकाम सुरू करावे, असे निर्देश राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक घेण्यात आली त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महानगरपालिकेमार्फत जिल्हा क्रीडा संकुलासोबत तेथे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सांगितलेल्या पार्किंगच्या प्रस्तावाबाबातही विचार करण्यात आला, परंतु स्मार्ट सिटीच्या पार्किंग सहित विकसन करण्याबाबतच्या प्रस्तावासाठी स्मार्ट सिटी, जिल्हा परिषद अथवा महापालिका यांचेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे पूर्ववत मूळ प्रस्तावित आराखड्यानुसार सर्व सोईंनीयुक्त क्रीडा संकुलाचे बांधकाम सुरु करावे. तसेच सर्व विभागांशी समन्वय साधून क्रीडा विषयक सुविधांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
सदर क्रीडा संकुला अंतर्गत प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रेक्षक गॅलरी, सिथेटीक धाव मार्ग, फुटबॉल मैदान, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, टेनिस, बास्केटबॉल, इत्यादी मैदाने, इनडोअर गेम हॉलमध्ये बॅटमिंटन, टेबल टेनिस, कुस्ती, ज्युदो, तलवारबाजी, बॉक्सिंग, कॅरम, बुध्दिबळ, योगा, व्यायमशाळा, या व्यतिरीक्त कॅफेटेरीया, पार्कींग अशा एकूण २४ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र नाईक यांनी यावेळी दिली आहे.