दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । भारतीय संविधान हे भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, आणि लोकशाही प्रजासत्ताक घोषित करते, नागरिकांना न्याय, समानता आणि स्वातंत्र्य आणि बंधुत्वाला चालना देण्यासाठी प्रयत्नांची हमी देते. युवकांनी संविधान साक्षर होऊन सर्व सामान्य लोकांना त्यांचे हक्क व कर्तव्याची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश संघटक – सचिव अॅड. राजू भोसले यांनी केले.
म्हसवड येथील श्रीमंत भैय्यासाहेब राजेमाने महाविद्यालया मध्ये राष्ट्रीय सेवा योजना व सामाजिक न्याय विभाग समान संधी केंद्र यांच्या संयुक्त विद्धमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून अॅड. राजू भोसले बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कदम एस. टी. होते. प्रमुख उपस्थितीत समान संधी केंद्र अध्यक्ष प्रा. पवार आर. जी., राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा. शिवाजी शिखरे, प्रा. सुजित जाधव, प्रा. रमेश बोबडे, प्रा. मनीषा सावंत, प्रा. डॉ. सौ. देशमुख एस. व्ही., प्रा. अंजली माने, प्रा. क्षीरसागर व्ही. डी., प्रा. विकास चंदनशिवे, प्रा. सावंत व्ही. आर. धनाजी कोले, दिलीप शिंदे हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना अॅड. राजू भोसले पुढे म्हणाले, २६ नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एक विशेष दिवस आहे. या दिवशी देशभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताने औपचारिकपणे संविधान स्वीकारले. हे संविधान २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले.
भारतीय संविधान तयार करण्यासाठी एकूण दोन वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्ये रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे. आपल्या देशाच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर आहेत. त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो. विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान 395 कलमाचे का लिहले ?? 394 किंवा 396 कलमाचे का लिहले नाहीत? तर त्याला कारण महात्मा फुले हे गुरू कारणीभूत आहेत ते कसे ?? तर महात्मा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षण ज्या पुण्यातील भिडे वाडयातून दिले; शाळा चालू केले; त्या शाळेचा क्रमांक 395 होता; त्याची व आपल्या गुरूविषयी कृतज्ञता म्हणून संविधान 395 कलमाचे लिहले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती धर्मातील लोकांच्या न्याय हक्कासाठी संविधान लिहले आहे. विध्यार्थी वर्गाने संविधान वाचून देशाची प्रगती करण्यासाठी व लोकशाही ची मूल्ये जोपासने गरजेचे आहे असे सांगितले.
यावेळी प्राचार्य डॉ. कदम एस. टी. व अॅड. राजू भोसले यांच्या हस्ते संविधानाचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा. शिवाजी शिखरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. क्षीरसागर व्ही. डी यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक समान संधी केंद्र अध्यक्ष प्रा. पवार आर. जी. यांनी केले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन प्रा. सावंत व्ही. आर.यांनी केले.व शेवटी आभार प्रा. विकास चंदनशिवे व प्रा. शिवाजी शिखरे यांनी मानले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.