यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये मानवी साखळीतून साकारले ‘संविधान दिन’; संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थी उत्स्फूर्त


स्थैर्य, फलटण, दि. ३१ डिसेंबर : येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या ‘घर घर संविधान’ अभियानांतर्गत (दि. २६ नोव्हेंबर २०२५ ते २६ जानेवारी २०२६) मंगळवारी (दि. ३०) विशेष उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध मानवी साखळीच्या माध्यमातून “संविधान दिन” हे शब्द साकारून संविधानाप्रती आदर व्यक्त केला.

कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून करण्यात आली. यावेळी प्रशालेच्या प्राचार्या सौ. एन. एम. गायकवाड, उपप्राचार्य श्री. पी. डी. घनवट आणि पर्यवेक्षिका सौ. सी. आर. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमात प्रशालेतील सर्व विभागांच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. मानवी साखळीद्वारे साकारलेले ‘संविधान दिन’ हे शब्द उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!