
स्थैर्य, सातारा, दि. 11 : रहिमतपूर, ता. कोरेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार आनंद गजानन गोसावी (वय 48) रा. व्यंकटपुरा, सातारा यांचा आज सकाळी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाने मृत्यू झाला. कोरोना युद्धात धोका पत्करून सेवा बजावताना दुसरा पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला आहे.
आनंद गोसावी हे 1991 मध्ये सातारा जिल्हा पोलीस दलात रुजू झाले. प्रथम सातारा शहर पोलीस ठाण्यात डिटेक्टिव्ह ब्रँचला काम केल्यानंतर कराड शहर, महाबळेश्वर, कोरेगाव पोलीस ठाण्यात त्यांनी कर्तव्य बजावले. सध्या ते दोन वर्षांपासून रहिमतपूर, ता. कोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कामकाज पाहत होते. दि. 21 रोजी आनंद गोसावी यांना धाप लागू लागल्यामुळे सातारा जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत सहाय्यक फौजदार म्हणून काम करणारे त्यांचे बंधू अजय गोसावी यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. 21 ते 24 जुलैदरम्यान त्यांच्यावर तेथील कोरोना सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. त्यांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर ऍन्जिओग्राफी करण्यासाठी त्यांना सातारा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रजेवर असल्यामुळे त्यांचा रहिमतपूर पोलीस ठाण्यातील इतर कर्मचार्यांशी संपर्क आला नव्हता. त्यामुळे पोलीस ठाण्यातील इतर कोणत्याही कर्मचार्यांना क्वारंटाइन करण्यात आले नसल्याची माहिती रहिमतपूर पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
आनंद गोसावी यांचा सातारा जिल्हा पोलीस दलात कबड्डीपटू म्हणून नावलौकिक होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. सलग दुसरा योद्धा गमावल्यामुळे जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.