आमदार क्षितिज ठाकूर व माजी महापौर यांच्या पाठपुरवठ्याने परवानगी शुल्क केले १०० टक्के माफ
स्थैर्य, विरार, दि. १७ : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून परवानगी साठी घेण्यात येणारे शुल्क यंदा वसई विरार महापालिकेने १०० टक्के माफ केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार क्षितिज ठाकूर आणि माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी १०० टक्के शुल्क माफीची मागणी केल्यानंतर पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सव निमित्ताने दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महानगरपालिकेकडून मंडप व अग्निशमन विभागाकडिल नाहरकत प्रमाणपत्र शुल्क भरणे आवश्यक व बंधनकारक आहे. यंदा देखील पालिकेतर्फे ते आकारण्यात येत होते. तसेच दुसरीकडे करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. यासाठी वसईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे देखील साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता परवानगीसाठी लागणारे शुल्क मंडळांना महानगरपालिकेला भरता येणे शक्य नाही. यासाठी ते माफ करावे अशी मागणी आमदार क्षितिज ठाकूर आणि माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी यांच्याकडे केली होती. त्यानंतर या शुल्कात ५० टक्के सवलत देण्याचे शुक्रवारी आयुक्तांनी जाहीर केले होते. मात्र शनिवारी झेडावंदनानंतर याबाबत आमदार क्षितिज ठाकूर आणि माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी आयुक्तांशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर त्यांची मागणी मान्य करत यंदा कोरोना चे सावट असल्याने गणोशोत्सव करिता लागणारी मंडप परवानगी व अग्निशमन परवानगी असे एकूण शुल्क ४५०० रुपये सरसकट माफ केल्याचे जाहिर केले व तसे आदेश संबंधीत प्रभाग समिती सहाआयुक्त यांना निर्गमित केले. यानिर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.