दैनिक स्थैर्य । दि. 01 ऑक्टोबर 2021 । फलटण । फलटण शहरात सध्या आगामी नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रीय काँग्रेसने पालिकेची गत निवडणूक रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली होती. मात्र तद्नंतर ते भाजपमध्ये दाखल झाले. आता फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्त्व नगरसेवक सचिन सूर्यवंशी बेडके व पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके हे करीत असून येणार्या निवडणूकीत ते काय भूमिका घेणार? महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादीसोबत जाणार की निवडणूक स्वबळावर लढणार? याकडे राजकीय वर्तृळाचे लक्ष लागले आहे.
फलटण नगरपालिकेवर 1991 पासून विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे एकहाती सत्ता आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे गत नगरपालिका निवडणुकीवेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करीत होते. गत निवडणुकीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाला चांगली टक्कर देत आपल्या नगरसेवकांची संख्या वाढवली. मात्र त्यानंतर राजकीय समिकरण बदलले. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झाले व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून सुद्धा निवडून आले. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष फलटण शहरासह तालुक्यात नावाला सुद्धा शिल्लक राहणार नाही असे बोलले जात होते. परंतु माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फलटण तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाची कमांड बेडके बंधुकंडे दिली. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीवर नगरसेवक सचिन सूर्यवंशी – बेडके तर काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांची निवड झाली. फलटण शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. त्या वर्गाला पुन्हा काँग्रेसकडे ओढून आणण्याचे काम बेडके बंधूनी केलेले आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी फलटण येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ह्या स्वबळावर लढण्याची तयारी करा, असे निर्देश दिलेले होते. त्यामुळे आगामी होणार्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र पॅनल टाकणार? कि राज्यात असणार्या महाविकास आघाडीप्रमाणे फलटणमध्येसुद्धा महाविकास आघाडी होणार? याकडे आता फलटण शहराचे लक्ष लागून राहिलेले आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार वार्ड पद्धती रद्द करून पुन्हा प्रभाग पद्धतीनेच निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रभाग रचनेनुसार निवडणूक लढवण्याचा आवाका नसणार्या गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या काहींनी आत्ताच माघार घेतल्यात जमा आहे. तर नगरपरिषदेची निवडणूक निर्धारित वेळेतच होईल असा कयास बांधुन कोणत्याही परिस्थितीत स्वत:ला भावी नगरसेवक मानणार्या अनेकांची रेलचेल आता शहरात दिसु लागली आहे. अशामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष नक्की काय भूमिका घेतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात काय हालचाली सुरु आहेत याची माहिती घेण्याचा प्रयत्न ‘स्थैर्य’ ने केला असता, ‘‘आगामी होणारी फलटण नगरपरिषदेची निवडणूक हि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने स्वबळावर लढणार आहे. फलटण शहरामध्ये काँग्रेस पक्षाची विचारधारा मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. आमचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या निर्देशानुसार आगामी होणार्या फलटण नगपरिषदेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ह्या संपूर्ण ताकदीने राष्ट्रीय काँग्रेस पक्ष लढणार आहे’’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांनी दैनिक स्थैर्यशी बोलताना दिली.