दैनिक स्थैर्य । दि. १८ जून २०२२ । मुंबई । मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, शेतकऱ्यांना अपुरी मदत, शेतकऱ्यांची वीज तोडणी यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर आंदोलन करण्याऐवजी काँग्रेस कार्यकर्ते गांधी परिवाराच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या गांधी परिवारासाठी काँग्रेसच्या मुठभर कार्यकर्ते नौटंकी आंदोलन करत जनतेला वेठीस धरत आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केले. राज्य सरकारने जनतेला वेठीस धरण्याचे प्रयत्न हाणून पाडून जनतेच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, असेही ते म्हणाले.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. उपाध्ये म्हणाले की, नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार राहुल गांधी यांच्या विरोधातील ईडी चौकशीत अडथळे आणून चौकशीवर दबाव आणण्यासाठी देशाला वेठीस धरून हिंसक आणि बेकायदा आंदोलन करण्याचा काँग्रेसचा कट असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. महाराष्ट्रातही काँग्रेसच्या मूठभर कार्यकर्त्यांनी राजभवनसह अन्य ठिकाणी निदर्शने केल्याने महाराष्ट्रातही जनतेला वेठीस धरण्याचे प्रयत्न होत आहेत.
असोसिएटेड जर्नल लिमिटेड या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता कवडीमोल किंमतीत हडपल्याच्या प्रकरणी राहुल गांधींची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर ‘ईडी’कडून सुरू झालेल्या चौकशी विरोधात सत्याग्रहाचा कांगावा करून देशातील कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आणण्याचे षड्यंत्र काँग्रेसकडून रचले जात आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात काँग्रेसची निदर्शने सुरू आहेत. काही राज्यांत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांनाच लक्ष्य केले, तर काही ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची कोंडी करून जनतेलाच वेठीस धरले, असेही श्री. उपाध्ये यांनी सांगितले.
श्री. उपाध्ये म्हणाले की, पक्षश्रेष्ठींवरील निष्ठा नोंदविण्यासाठी आंदोलनात उतरलेल्या नेत्यांनी आपली विवेकबुद्धी हरवल्याचे सिद्ध केले असून देशात अराजक माजविण्याच्या कटात सहभागी झाल्याने त्यांनी आपली उरलीसुरली विश्वासार्हतादेखील गमावली आहे. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याकरिता सुरू असलेल्या या आंदोलनाच्या निमित्ताने सामान्य जनतेला आणि सुरक्षा यंत्रणांना वेठीस धरून दबाव आणण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल व काँग्रेसच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा करून देईल, असा टोलाही उपाध्ये यांनी हाणला.