दैनिक स्थैर्य । दि. ०१ एप्रिल २०२३ । भोपाळ । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भोपाळमध्ये मध्य प्रदेशसाठीच्या पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. मोदींच्या उपस्थितीत राणी कमालापती रेल्वे स्थानकावरुन वंदे भारत ट्रेन रवाना झाली. मध्य प्रदेशला आज आपली पहिली वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मिळाली आहे. यामुळे भोपाळ ते दिल्लीचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे. ही ट्रेन प्रोफेशनल्स, तरुण, व्यावसायिक इत्यादींसह अनेकांसाठी नव्या सुविधा घेऊन येणार आहे, असं मोदी म्हणाले.
“आधुनिक भारतात नव्या व्यवस्था निर्माण होत आहे. नव्या परंपरा बनत आहेत. आजचा कार्यक्रम देखील याचं एक उत्तम उदाहरण आहे. आज ज्या रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेनला हिरवां कंदील दाखवला जात आहे. त्याच रेल्वे स्टेशनच्या लोकापर्णाचं भाग्य मला प्राप्त झालं होतं. रेल्वेच्या इतिहासात असं खूप कमी वेळा घडलं असेल की एकाच रेल्वे स्थानकावर इतक्या कमी कालावधीत एखाद्या पंतप्रधानाची दुसऱ्यांदा भेट घडावी”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.