स्थैर्य ,जम्मू, दि. २८: काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी जम्मूमध्ये एका सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. आझाद म्हणाले, मला अनेक नेत्यांच्या अनेक गोष्टी आवडतात. मी स्वतः एका खेड्यातून आलो आहे. मला याचा अभिमान वाटतो. आपले पंतप्रधानही सांगतात, की ते ही एका गावातूनच आले आहेत. काहीच नव्हते, भांडी घासत होते, चहा विकत होते. ते म्हणाले, आमचे राजकीय मतभेद आहेत. मात्र, किमान जे आपले वास्तव आहे, ते लपवत नाहीत. जे लोक आपले वास्तव लपवतात. ते खोट्या विश्वात राहतात. व्यक्तीला अभिमान असायला हवा.
गुलाम नबी आझाद आज जम्मू येथे गुज्जर देश चॅरिटेबल ट्रस्टच्या एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी येथे ट्रस्टचे सर्वात पहिले ट्रस्टी मसूद चौधरी यांच्या नावाने सुरू केलेल्या लायब्ररीचे उद्घाटन केले. यानंतर त्यांनी गुज्जर बकरवाल समुदायाला संबोधित केले. येथे त्यांनी पंतप्रधान मोदींची खरे बोलण्यावरून प्रशन्सा केली.
गुलाम नबी आझाद नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निरोपाच्या वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे जबरदस्त कौतुक केले होते. यावेळी मोदी भावूकही झाले होते. यानंतर आझादांनीही पंतप्रधानांचे आभार मानत कौतुक केले होते.
आझाद म्हणाले, “कोविडच्या काळात डबल शिफ्टमध्ये काम करत आहे. जे राजकीय नेते मोठे झाले आहेत, त्यांना व्यवस्थित करणे कठीण आहे. मात्र, जे युवा आहेत त्यांना काही तरी करून दाखवायचे आहे.” ते म्हणाले, जम्मू काश्मिरात अजूनही विकास झालेला नाही. ज्या विकासाचे दावे केले जात आहेत, ते केवळ कागदांवरच आहेत.
टॅक्सच्या नावावर जम्मूतील लोकांची लूट होत आहे. टॅक्स कमाईवर असायला हवा, मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये कमाईची माध्यमं वाढविण्यात आली नाहीत. येथे शनिवारी गुलाम नबींच्या अध्यक्षतेखाली G-23 नेत्यांची बैठक पार पडली. यात काँग्रेसचे सर्व असंतुष्ट केते सामील झाले होते. या शक्ती प्रदर्शनावर बोलताना गुलाम नबी आझाद म्हणाले, हे शक्ती प्रदर्शन सध्या केवळ 10% आहे. तर 90% शक्ती प्रदर्शन अद्याप बाकी आहे. जम्मूचे 370 हटविल्यासंदर्भात आझाद म्हणाले, सध्या अशी स्थिती आहे, जसे की पोलीस डीजीपींना शिपाई बनविले आहे.