दैनिक स्थैर्य । दि. १२ नोव्हेंबर २०२२ । फलटण । काँग्रेसचे युथ आयडॉल राहुलजी गांधींच्या विचाराने आगामी गिरवी ग्रामपंचायत निवडणूक काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजिंक्य कदम यांनी केले आहे.
देशात संविधान बचाव, बेरोजगारी, महागाई, गावातील दहशतवाद, गावातील जाती – धर्मातील भांडणे, गावातील बहुजन वर्गातील युवकांना रोजगार निर्मिती प्रश्न असताना या कडे दुर्लक्ष झालेले आहे. फलटण तालुक्यात देखील वेगळी परिस्थिती नाही द्वेषाचे, दडपशाहीचे, राजकारण चालू आहे. आम्ही गिरवी गावातील तरुणांना बरोबर घेऊन राजकरण विरहित समाजकारण करून ग्रामपंचायत अंतर्गत विकास योजना व व्यावसायिक प्रकल्प राबवून युवकांना रोजगाराची संधी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करणार आहोत.
गावच्या निवडणुकीत युवकांना व्यसनाला बळी न पडता, दारू, मटण जेवणे न देता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिवीर उमाजी नाईक, आण्णाभाऊ साठे या महापुरुषांची शिकवण घेऊन गावातील घराणेशाहीतुन गुलामगिरी मुक्त व दहशतमुक्त गिरवी करण्याचं प्रयन्त केला जाईल आणि गावातील थोर काँग्रेस विचाराचे नेते माजी आमदार स्व. चिमणराव कदम, रामाराव आण्णा, शामराव आप्पा, दत्तू भाऊ, बुवा काका, सदाशिव आप्पा, रामभाऊ तात्या, बबन काका, बुवासाहेब आप्पा, बाबुराव काका यांचा गावातील काँग्रेसच्या विचाराचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि तालुक्यात गिरवी गाव पुन्हा आघाडीवर आणण्याकरिता गावातील युवक निवडणूकीत उतरणार असून फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अच्युतराव खलाटे, डॉ.सचिन सूर्यवंशी बेडके, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, कार्याध्यक्ष अमिरभाई शेख, फलटण शहर काँग्रेसचे अध्यक्ष पंकज पवार, सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस गंगाराम रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गांवातील सर्व ज्येष्ठ मंडळी व युवकांच्या सहकार्याने गिरवी ग्रामपंचायतची निवडणूक लढवली जाणार आहे असे अजिंक्य कदम यांनी सांगीतले.