मतदार यादीतील घोळाबाबत काँग्रेसने दिला होता इशारा; आता नगरपालिका निवडणुकीत येतोय प्रत्यय


स्थैर्य, फलटण, दि. 13 ऑक्टोबर : फलटण नगरपरिषदेच्या प्रारूप मतदार यादीत एकाच पत्त्यावर अनेक मतदार असल्याची गंभीर बाब समोर आली असून, या संभाव्य घोळाबाबत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीपूर्वीच निवडणूक आयोगाला पत्र लिहून सावध केले होते, ही माहिती आता समोर आली आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी ही माहिती दिली असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी मतदारांचे तातडीने ‘स्पॉट व्हेरिफिकेशन’ (प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी) करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली आहे.

नगरपरिषदेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक प्रभागांमध्ये एकाच पत्त्यावर अनेक मतदार नोंदवलेले असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मतदार याद्यांमध्ये हेतुपुरस्सर बदल करून बोगस मतदार नोंदवले गेल्याचा संशय निर्माण झाला आहे.

महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधीच राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहून या समस्येकडे लक्ष वेधले होते. मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातच मतदारांचे ‘स्पॉट व्हेरिफिकेशन’ होणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा प्रकारचा घोळ टाळता येईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले होते.

आता नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हाच प्रकार पुन्हा उघडकीस आल्याने, निवडणूक आयोगाने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन तातडीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन मतदारांची तपासणी करावी, अशी मागणी सूर्यवंशी यांनी पुन्हा एकदा केली आहे.


Back to top button
Don`t copy text!