
स्थैर्य, मुंबई, दि.३: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्त्वूपर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरें अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. आता येथे मेट्रो कारशेड होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र काँग्रेसचे जेष्ठ नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर मोठा आरोप केला आहे.
संजय निरुपम ट्विट करत म्हणाले आहेत की, सरकारने गुरुवारी आरेमध्ये 600 एकरचा परिसर वनासाठी राखीव ठेवाल्याचे घोषित केले. पण येथे प्रस्तावित मेट्रोशेड वेगळे करण्यात आले आहे. हा शिवसेनेने केलेला घात आहे. त्याच ठिकाणी कारशेडचे काम सुरू ठेवण्याचा कट रचला जातोय. शहरामध्ये जंगल आणि जंगलाच्या मधोमध मेट्रो स्टेशन. हे विकासाचे असे कसे मॉडल आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.
दरम्यान सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार आहे. मात्र तरीही काँग्रेसकडून आपल्याच मित्र पक्षावर आरोप लावण्यात आले आहेत. सरकार स्थापन झाले तेव्हापासूनच तिन्हीही पक्षांमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसते. आता पुन्हा एकदा तेच समोर आले आहे.