
स्थैर्य, सातारा, दि. 11 : करोनाचा धोका लक्षात घेऊन लॉकडाउन करण्यात आले होते. लॉकडाउनमध्ये काही शिथिलता आल्याने गेली अडीचे ते तीन महिने घरात असलेल्या मंडळींनी आता यवतेश्वर, कास, बामणोलीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
कास-बामणोलीकडे लोकांची गर्दी वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी लगेच धाव घेऊन अनेकांवर दंडात्मक कारवाई केली. शासनाने आता सर्वसामान्यांचे जीवन सोपे व्हावे म्हणून काही गोष्टींमध्ये सवलती दिल्या आहेत.
मात्र या सवलतींचा नागरिकांकडून गैरवापर होत आहे. विनाकारण एकत्र येण्यास मनाई असताना देखील अनके वाहने कास परिसरात आढळली. हौशीने फोटोसेशन केले. काही तरुण बाईक रायडिंग व स्टंट करत होते. यवतेश्वर, सांबरवाडी येथे वाहनांची तपासणी केली जात होती. अनेकांनी सोबत मास्कही आणले नव्हते. समोर दिसल्यानंतर तोंडाला रूमाल बांधत होते.शासन वेळोवेळी जनजागृती करत आहे. असे असताना स्वत: बरोबर दुसर्याच्या आरोग्याची काळजी घेऊन फक्त कारणासाठीच घरातून बाहेर पडावे, हे असतानाही काही तरुण मात्र हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. प्रशासनाने याला चाप बसवावा.