स्थैर्य, कराड, दि. 13 : येथील शाहू चौकात रविवारी रात्री गुन्हेगार अभिनंदन झेंडे याच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. मात्र जीवाच्या आकांताने झेंडे याने पोलिसांना फोन लावला अनं पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे जीव वाचला. घटनास्थळी तत्काळ पोलीस पोचल्याने खून करण्याच्या उद्देशाने आलेल्या अनिकेत रमेश शेलार (वय 21), रा. शास्त्रीनगर, इंद्रजित हणमंतराव पवार (वय 23), रा. लाहोटीनगर, सुदर्शन हणमंत चोरगे (वय 20), रा. कोयना वसाहत, आशिष अशोक पाडळकर (वय 33), रा. सनसिटी, मलकापूर, ता. कराड या चौघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या दक्ष कामगिरीमुळे गजाआड करण्यात आले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवार, दि. 12 सायंकाळी 7.15 च्या सुमारास एक सिल्वर रंगाची (एमएच 11 बीवाय 4040) या पोलो वाहन शाहू चौकात लावून एका केसकर्तनालय दुकानाच्या बाहेर खुनी हल्ला करण्याच्या उद्देशाने हातात कोयता, विळा, दांडके घेवून गाडीत अनिकेत शेलार, इंद्रजित पवार, सुदर्शन चोरगे व आशिष पाडळकर हे चौघेजण बसले होते.
अभिनंदन झेंडे व त्याचे मित्र केसकर्तनालय दुकानात नाष्टा करून बाहेर पडताच सदर चारही इसमांनी झेंडे व त्याचे मित्र यांच्याशी वादविवाद करून झेंडे याच्या गळ्यावर कोयत्याने हल्ला केला. अभिनंदन झेंडे याने सदरचा घाव चुकवून जवळच आपल्या केसकर्तनालय दुकानात मित्रासह जावून लपून बसला व आतून कडी लावून घेतली. संशयित आरोपी केसकर्तनालय दुकानाच्या दरवाजावर कोयता मारून बाहेर ये, असे ओरडत होते. यावेळी अभिनंदन झेंडे याच्या मित्राने दुकानातून कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांना फोन करून हल्ल्याबाबत माहिती दिली. यावेळी क्षणाचाही विलंब न करता स.पो.नि. विजय गोडसे व त्यांचे पथक शाहू चौकात क्षणार्धात पोहोचले. चौघांनाही हत्यारासह त्यांना ताब्यात घेतले. पुढील तपास स.पो.नि. अमित बाबर करत आहेत.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, वरिष्ठ पेालीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, पोलीस हवालदार नितीन येळवे, देवा खाडे, संजय जाधव, प्रफुल्ल गाडे, चव्हाण व होमगार्ड अमोल जंगम, अक्षय निकम, गणेश खुडे, चंद्रशेखर म्हेत्रे यांच्या पथकाने केली.
सूरज गुरव म्हणाले, कराड शहरात होणार्या गुन्हेगारी हालचालींवर माझ्यासह, कराड शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांचे विशेष लक्ष असून वेगवेगळी पथके व गोपनीय यंत्रणा सतर्क करून प्रत्येक गुन्हेगारी टोळी व गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष आहे.
कराड शहरातील गुन्हेगारी वर्चस्व मोडून काढण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी चार्ज घेतल्यापासून कंबर कसली आहे. त्यांनी अनेकजणांना मोका, तडीपारी प्रस्तावामुळे कराड शहरातील गुंडगिरी नियंत्रणात आणली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अनेक गुंड कराड शहर सोडून पसार झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे गुंड जामिनावर सुटले आहेत त्यांची गुन्हेगारी कृत्ये सुरू आहेत. त्यावर पोलिसांची करडी नजर असून, अनेकांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव सादर करून तडीपार करण्यात आले आहे. काही गुंड प्रवृत्तींच्या इसमांचे अभिलेख तयार करून तडीपारीचे प्रस्ताव सादर करून, त्यांना लवकरच तडीपार करण्यात येणार आहे. कराड शहर व परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची गुंडगिरी चालणार नाही याबाबत पोलीस प्रशासन अत्यंत संवेदनशील आहे.