दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक सतिश ननवरे या बारामतीच्या सुपुत्राने यशस्वी कामगिरी करत राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, अवघ्या अठराव्या वर्षी अभिषेकने केलेल्या या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी युवा आयर्नमॅन अभिषेक ननवरेचे अभिनंदन केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात, शारिरिक क्षमतेचा कस लावणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेकने १८० किलोमीटर सायकलींग, ४२.२ किलोमीटर धावणे आणि समुद्रात ३.८ किलोमीटर अंतर समुद्रात पोहणे ही आव्हाने १३ तास ३३ मिनीटे अशा विक्रमी वेळेत पूर्ण केली. अभिषेकचे वडील सतिश ननवरे यांनी यापूर्वी आयर्न मॅन हा किताब पटकविला आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून अभिषेकने अवघ्या अठराव्या वर्षीच ही यशस्वी कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीचा सर्वांना अभिमान आहे, त्याच्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा,अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिषेकचे कौतुक केले आहे.