दैनिक स्थैर्य । दि. १८ फेब्रुवारी २०२३ । सातारा । रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयात मराठी भाषा विभाग प्रमुख व मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केलेले महाराष्ट्रातील एक ख्यातकीर्त ग्रामीण साहित्यिक प्रा.डॉ.द.ता.भोसले यांना महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालय मुंबई तर्फे मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन[ व्यक्ती] पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी मराठी भाषेत ग्रामीण बोलींचा संग्रह [दोन दुर्मिळ म्हणींचा संग्रह [तीन ] लिहून विशेष असे योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा.डॉ.द.ता.भोसले यांनी आतापर्यंत मराठी भाषेत चार कादंबऱ्या, बारा कथासंग्रह, आठ ललित ग्रंथ, दहा लोकसाहित्य, लोकसंस्कृतीवरील ग्रंथ, आठ समीक्षा ग्रंथ, दोन चरित्र ग्रंथ, लेखकांच्या पुस्तकांना दिलेल्या प्रस्तावनेची तीन पुस्तके व चौदा संपादने इत्यादी पुस्तके प्रकाशित केली आहेत. डॉ द.ता.भोसले यांना सोळा जीवन गौरव पुरस्काराने आत्तापर्यंत सन्मानित करण्यात आले आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे चार, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,भारती विद्यापीठ पुणे, बाळासाहेब विखे प्रतिष्ठान, आचार्य अत्रे प्रतिष्ठान, दमाणी साहित्य पुरस्कार इत्यादी मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत. एकूण आतापर्यंत दोनशे पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांनी मराठी भाषा अभ्यासक्रम मंडळ, शिवाजी विद्यापीठ पुणे, बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळ पुणे या संस्थावर काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील नामांकित व्याख्यान मालेत व्याख्याने दिली आहेत. तसेच त्यांची शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, रामानंदतिर्थ विद्यापीठ अमरावती, मराठवाडा विद्यापीठ येथे पुस्तके अभ्यासक्रमासाठी लागली आहेत. त्यांनी साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, लोकसाहित्य लोकसंस्कृती मंडळ या मान्यवर संस्थांवर काम केले आहे. डॉ.द.ता.भोसले हे १९८० पूर्वी दीर्घकाळ सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख म्हणून काम करीत होते. त्याना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सातारयात छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर ,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे,मराठी विभागातील डॉ.कांचन नलवडे, डॉ.विद्या वडकर, डॉ.संजयकुमार सरगडे,प्रा.प्रियांका कुंभार, प्रा.श्रीकांत भोकर व मराठी विभागातील माजी प्राध्यापक व आजी व माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.