दैनिक स्थैर्य । दि.०७ मार्च २०२२ । मुंबई । राष्ट्रीय स्तरावरील ‘नारी शक्ती पुरस्कार’ विजेत्या महाराष्ट्रातल्या तीन महिलांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. आंतरराष्ट्रीय महिलादिनी उद्या (8 मार्च) या तिघींसह देशातील 29 महिलांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
या पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या दिव्यांग कथक नर्तिका सायली नंदकिशोर आगवणे, पहिल्या महिला सर्पमित्र वनिता जोगदेव बोराडे आणि सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘नारी शक्ती पुरस्कार’ दिले जातात. त्यामध्ये यंदा महिला सक्षमीकरण आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या देशातील 29 महिलांना 2020 आणि 2021 यावर्षांचे ‘नारी शक्ती पुरस्कार’ प्रदान केले जाणार आहेत.
‘राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, क्रांतिज्योती सावित्रीबाई यांसह अनेक कर्तबगार स्त्रियांनी हा महाराष्ट्र घडवला आहे. हा वारसा आणि वसा पुढे घेऊन जाणाऱ्या महाराष्ट्रातील माता-भगिनींना असे पुरस्कार पुन्हा-पुन्हा मिळणे, त्यांची कर्तबगारी सिद्ध होणे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन संदेशात म्हटले आहे.