दैनिक स्थैर्य । दि. 08 डिसेंबर 2021 । फलटण । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून ज्ञानदा सचिन कदम ह्या 6 वर्षीय चिमुकलीने तैलबैला सुळक्यावरुन महामानवास महाअभिवादन केले. विशेष म्हणजे कु.ज्ञानदाची 15 दिवसातील ही दुसरी चित्तथरारक मोहीम आहे. अजून एक चिमुकली आरोही लोखंडे हिनेही ही मोहीम फत्ते केली.
आरोहणासाठी अत्यंत कठीण श्रेणीमध्ये गणला जाणारा 90 अंशातील 300 फूट उंच असणारा तैलबैला कातळ कडा समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार तीनशे वीस फूट उंच आहे. या मोहिमेद्वारे, ‘मुलींनो शस्त्र आणि शास्त्र हाती घ्या. शस्त्र हाती घेतले तर मनगट बळकट होईल आणि शास्त्र हाती घेतले तर मन बळकट होईल आणि जेव्हा मन आणि मनगट बळकट असेल तेव्हा कोणासमोरही अबला म्हणून झुकावे लागणार नाही’, असा संदेश तिने मुलींना दिला आहे.
नुकतेच तिने 30 नोव्हेंबर 2021 रोजी कार्तिकी एकादशी निमित्त हिंदूंचा धर्म ग्रंथ श्रीमदभगवद्गीतेचे पारायण केले आहे. शास्त्र शिकायचे असेल तर संस्कृत ही भाषा आलीच पाहिजे यासाठी तीने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इयत्ता पहिलीपासून सर्व शाळांमध्ये संस्कृत विषय शिकवला जावा, अशी मागणीही केली आहे. बुधभूषण ग्रंथाचे संस्कृतमधून पारायण करण्याचा तिचा पुढील संकल्प आहे.
कु.ज्ञानदाच्या आगामी मोहिमा दि.12 डिसेंबर वजीर, दि.19 डिसेंबर कळकराई व दि.26 डिसेंबर वानरलिंगी अशा आहेत.
या गिर्यारोहानाच्या मोहिमेमध्ये ज्ञानदाचे वडील सचिन कदम, आई मोक्षदा कदम, दोन मामा स्वराज ढेंबरे, रवींद्र यादव हे सहभागी होते.