जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ सप्टेंबर २०२१ । मुंबई । रुग्णसेवेच्या माध्यमातून मानवसेवा करणाऱ्या राज्यातील फार्मासिस्ट बंधु-भगिनींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘जागतिक फार्मासिस्ट दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टर, नर्सेस यांच्याइतकेच फार्मासिस्ट बांधवांचे कामही महत्त्वाचे असून ते रुग्णांसाठी जीवनरक्षकाची भूमिका बजावत असतात. कोरोनाकाळात फार्मासिस्ट बांधवांनी जीवाची जोखीम पत्करुन रुग्णांना अहोरात्र सेवा दिली. त्यांच्याशिवाय आरोग्यसेवा अपूर्ण आहे, अशा शब्दात फार्मासिस्ट बंधु-भगिनींच्या सेवेचा  गौरव करुन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रुग्णसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

‘जागतिक फार्मासिस्ट दिना’निमित्त शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आरोग्यसेवेत ‘फार्मासिस्ट’चे स्थान अढळ आहे. ‘फार्मासिस्ट’च्या सहभागाशिवाय रुग्ण रोगमुक्त होणे शक्य नाही. आजारांचे कारण शोधून त्यावर परिणामकारक औषध तयार करणे. चाचणी घेऊन सुरक्षित औषध रुग्णांना उपलब्ध करुन देणे, औषधांचा पुरवठा कायम ठेवणे, अशा अनेक जबाबदाऱ्या ‘फार्मासिस्ट’ नियोजनबद्धपणे पार पाडत असतात. समाजाला निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र योगदान देत असतात. कोरोना संकटकाळात ‘फार्मासिस्ट’ बांधवांनी उल्लेखनीय कार्य केले. सुरुवातीला सगळे व्यवहार बंद असताना केवळ ‘फार्मसी’ सुरु होत्या. यावरुन त्यांचे महत्त्व लक्षात येते. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करण्यासाठी जगभरातील ‘फार्मासिस्ट’ संशोधकांनी अहोरात्र मेहनत केली.  ही मंडळी ‘देवदूता’चे कार्य करीत असून त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. फार्मासिस्ट बांधवांचे आरोग्यसेवेतील महत्व, गरज व कामगिरी लक्षात घेऊन सर्वांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञ असले पाहिजे. आरोग्ययंत्रणेतील महत्त्वाचा घटक म्हणून फार्मासिस्ट बांधवांना योग्य सन्मान मिळाला पाहिजे. ‘जागतिक फार्मासिस्ट दिना’ निमित्ताने ‘फार्मासिस्ट’ बांधवांच्या सेवाकार्याची नोंद सर्वांकडून घेतली जाईल. ‘फार्मासिस्ट’कडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!