‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभेच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत व मार्गदर्शन करीत राहील – उपमुख्यमंत्री अजित पवार 

स्थैर्य, मुंबई. दि. 6 : छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायानं राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण केली. राजनिती, युद्धनिती, अर्थकारण, मानवतावाद, पर्यावरणसंवर्धन कुशलतेसह, भविष्याचा वेध घेण्याचं द्रष्टेपण असलेले ते राजे होते. त्यांनी गाजवलेलं शौर्य, केलेला पराक्रम, घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत, मार्गदर्शन करीत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना त्रिवार वंदन केलं आहे. महाराष्ट्रातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. त्यांच्यासारखा महामानव एकदाच जन्म घेतो आणि अखिल मानवजातीचं कल्याण करुन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात केलेलं कार्य अलौकिक आहे. त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जागवली. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना, अठरापगड जातींना एकत्र करुन त्यांच्या मनात, स्वाभिमानाचं, स्वराज्याचं बीज रुजवलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आपलं वाटेल, जिथं सर्वांना न्याय मिळेल असं स्वराज्य निर्माण केलं. शेतकऱ्यांना न्याय दिला. कष्टकऱ्यांना स्वाभिमान दिला. शिवराज्याभिषेकानं महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. त्यांच्यासारखा राजा मिळाला म्हणूनच शिवराज्याभिषेक दिनाचं आपल्या जीवनात सर्वाधिक महत्वं आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे, युगप्रवर्तक राजे अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना, शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं वंदन करत असताना त्यांच्या विचारांना आदर्श मानून, त्यांनी दाखवलेल्या मार्गानं चालण्याचा निर्धार करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञता, आदर व्यक्त करीत राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!