दैनिक स्थैर्य । दि. १८ जून २०२२ । मुंबई । राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपली आवड, कल बघून पुढील शैक्षणिक कारकिर्दीची दिशा ठरवावी, परीक्षेतील यशाबरोबरच अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात, यंदा 96.94 टक्के विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असला तरी अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शैक्षणिक कारकिर्दीच्या बरोबरीने आपले व्यक्तिमत्व अष्टपैलू, सर्वांगसुंदर घडविण्याचा प्रयत्न करावा. शैक्षणिक कारकिर्द ठरवण्यासाठी योग्य शाखा निवडण्याचा दहावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कला, क्रीडा, छंद आणि कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटलं आहे.