दैनिक स्थैर्य । दि. २५ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । “भारतीय संविधान जगातील सर्वोत्कृष्ट संविधान, भारतवासियांची ताकद, जगण्याचा मूलाधार आहे. संविधानानं देशातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार दिला आहे. सन्मानानं जगण्याचं, इच्छेनुसार वागण्याचं, निर्भयतेने व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. विकासाची समान संधी उपलब्ध केली आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेला भारत अखंड, एकसंध ठेवण्याची ताकद संविधानात आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांताच्या नागरिकांना एकजूट ठेवून त्यांच्या मनात एकता, समता, बंधूतेचा विचार रुजवणं संविधामुळेच शक्य झालं आहे. सर्वधर्मसमभाव, मानवतावाद संविधानाचा गाभा आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमत्व संविधानामुळेच अबाधित आहे. भारतीय संविधानाचं हे महत्व सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा, देशाच्या भावी पिढीला संविधान साक्षर करुन लोकशाही मूल्यांवरील विश्वास अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आज संविधान दिनाच्या निमित्तानं करुया,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतील संविधान व लोकशाही व्यवस्थेचं महत्व अधोरेखित करुन समस्त देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार संविधान दिनानिमित्त शुभेच्छा देतांना म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी वर्ष 1949 मध्ये आजच्याच दिवशी देशाला संविधान अर्पण केलं. या संविधानानं देशातील प्रत्येकाला मान, सन्मान व समानतेचा हक्क दिला. संविधानानं दिलेल्या स्वातंत्र्य, समता व बंधूतेच्या विचारांचा अवलंब करुन देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित राखणं. देशाला एकजूट ठेवणारी सर्वधर्मसमभावाची भावना अधिक दृढ करणं हे आपलं नैतिक व राष्ट्रीय कर्तव्य आहे. भारतीय संविधान तसंच लोकशाही मूल्यांची जपणूक करीत त्यांचं महत्व भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याचा, देशाची लोकशाही अधिक मजबूत करण्याचा पुनर्निर्धार आज संविधान दिनाच्या निमित्तानं सर्वांनी करुया, असं आवाहन करीत उपमुख्यमंत्र्यांनी महामानव डॉ. बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केले असून देशवासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्याआहेत.