स्थैर्य, मुंबई, दि.१७: दरवर्षीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी, बारावीच्या परीक्षांचे आयोजन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) करते. या परीक्षांचे वेळापत्रक सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये जाहीर होते. यंदा कोरोनामुळे या शैक्षणिक वर्षाबाबतच पेच असून परीक्षा अर्ज भरून घेण्याची प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम कायम आहे. शिक्षण विभागाने किमान आराखडा तयार करून हा संभ्रम दूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग विचार करत आहे. त्यानुसार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरमध्ये शाळा सुरू होतील, असे गृहीत धरले तरी त्यानंतर बारावीच्या परीक्षेसाठी अवघे दोन महिने, तर दहावीच्या परीक्षेसाठी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक राहील. सध्या २५ टक्के कपात केलेल्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त अजून कपात होईल का, याबाबतही स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली.
दहावी, बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत शिक्षण विभागाने स्पष्टता आणावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि राज्य मंडळ अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षांचे स्वरूप कसे असेल, गुणांकन पद्धती कशी असेल, परीक्षा कधी होतील, त्यांच्या मूल्यमापनासंदर्भातील धोरण आदींबाबतची स्पष्टता विद्यार्थी, शिक्षकांना आल्यास त्यादृष्टीने अभ्यासाची तयारी करता येईल व मानसिक ताणही कमी होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.