दैनिक स्थैर्य । दि. ८ जुलै २०२१ । सातारा । सातारा सिव्हील हॉस्पिटलमधील प्रसिध्द वैद्यकीय अधिकार्याकडून उपचारासाठी आलेल्या तृतीय पंथीयांना अपमानास्पद वागणुक दिल्यामुळे तृतीयपंथीयांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ घातला. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने सिव्हील सर्जन यांनी अखेर नरमाईची भूमीका घेत वैद्यकीय अधिकार्यास माफी मागण्यास सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी सिव्हील हॉस्प्टिलमध्ये डोळ्याच्या वॉर्डमध्ये तृतीयपंथीय पेशंट दाखल होता. त्याचे सिटी स्कॅन करण्यासाठी 7 जुलै 2021 रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास काही तृतीयपंथीय वॉर्ड क्र.11 मेडीसीन वॉर्ड मध्ये वैद्यकीय अधीकारी डॉ.प्रकाश पोळ यांना भेटले. आमच्या पेशंटचे सिटी स्कॅन करायचे आहे त्यासाठीचा फॉर्म तुम्ही भरा अशी मागणी तृतीयपंथीयांनी वैद्यकीय अधिकार्याकडे केली. जे डॉक्टर तृतीयपंथी पेशंटचा उपचार करत आहे त्यांनी तो फॉर्म भरून त्यावर सजेंशन नोंद करून आणा. तसेच मी पेशंट तपासत आहे थोडं थांबा असे वैद्यकीय अधिकारी डॉ. पोळ यांनी तृतीयपंथीयांना सांगितले. यावरून दरम्यान तृतीयपंथीय व वैद्यकीय अधिकार्यांमध्ये त्यांच्या वॉर्डातच शाब्दीक चकमक उडाली. नंतर त्यांचे पर्यवसन वादविवादामध्ये सुरू झाल्याने सिव्हील मध्ये एकच गोंधळ उडाला.
यानंतर वैद्यकीय अधीकारी डॉ. पोळ यांनी सिव्हीलच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. व त्यानंतर सिव्हील सर्जन डॉ. सुभाष चव्हाण यांना घडला प्रकार सांगितला. तृतीयपंथीयांनी देखील सिव्हील सर्जन यांच्या दालनात एकत्र जमून आमच्यासोबत वैद्यकीय अधिकारी पोळ यांनी अपमानास्पद वागणूक दिली असल्याचे सांगितले. वैद्यकीय अधीकारी डॉ.पोळ यांनी आमची जाहीर माफी मागावी असा पवित्रा घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना देखील खडे बोल सुनावत एकच गोंधळ घातला.
डॉ. सुभाष चव्हाण यांनी एकुणच गोंधळाची परिस्थिती पाहुन वैद्येकीय अधिकारी यांना तृतीय पंथीयांची माफी मागायला सांगून घडलेल्या घटनेबद्दल कोणतीही पोलीस तक्रार न करता अखेर माफीनामा नाट्याने प्रकरणावर पडदा पडला.